अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना रब्बी अनुदानाचे वितरण सुरू, खात्यात हेक्टरी १०,००० रुपये जमा.
खरीप हंगामातील नुकसानीची भरपाई म्हणून रब्बीच्या तयारीसाठी राज्य शासनाने जाहीर केलेले विशेष पॅकेज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. वाशिम, धाराशिवसह अनेक जिल्ह्यांमध्ये रक्कम वितरणाला सुरुवात झाली असून, पात्र शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
विशेष प्रतिनिधी:
खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान सोसाव्या लागलेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या विशेष अनुदान पॅकेजचे वितरण अखेर सुरू झाले आहे. कालपासून वाशिम, धाराशिव या जिल्ह्यांसह अनेक भागांतील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना रब्बीच्या तयारीसाठी, बियाणे आणि इतर खर्चांसाठी हेक्टरी १०,००० रुपये अनुदान देण्यात येत आहे.
काय आहे योजना आणि किती मिळणार मदत?
यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. या नुकसानीची भरपाई म्हणून आणि आगामी रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे व खते खरेदी करता यावीत, यासाठी राज्य सरकारने सुमारे १०,००० कोटी रुपयांचे विशेष पॅकेज मंजूर केले आहे. या संदर्भातील शासन निर्णय २८ ऑक्टोबर आणि ४ नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आले होते. निवडणूक आयोगानेही या निधी वितरणाला हिरवा कंदील दाखवल्याने आचारसंहितेचा कोणताही अडथळा आता राहिलेला नाही.
या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना हेक्टरी १०,००० रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. मात्र, ही रक्कम नुकसानीच्या टक्केवारीनुसार दिली जात आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या खात्यात ५,००० रुपये किंवा त्यापेक्षा कमी रक्कम जमा झाल्याचे संदेश येत आहेत. नुकसानीच्या पंचनाम्यात नोंदवलेल्या टक्केवारीनुसार अनुदानाची रक्कम निश्चित केली जात असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
‘हे’ शेतकरी असणार पात्र
या अनुदानासाठी एक अत्यंत महत्त्वाची अट ठेवण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांना यापूर्वीच्या टप्प्यातील अतिवृष्टी नुकसान भरपाईचा लाभ मिळाला आहे, केवळ त्याच शेतकऱ्यांना हे रब्बी अनुदान दिले जात आहे. ज्या शेतकऱ्यांना मागील अतिवृष्टीचे अनुदान मिळालेले नाही, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. अशा शेतकऱ्यांनी आपल्या तलाठी किंवा तहसील कार्यालयात संपर्क साधून माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
अनुदान जमा होण्यास सुरुवात, टप्प्याटप्प्याने होणार वितरण
कालपासून अनेक जिल्ह्यांमध्ये निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. वाशिम जिल्ह्यातील मंगळूरपीर तालुक्यातील कोळंबी गावातील काही शेतकऱ्यांच्या खात्यात, तसेच धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाल्याचे संदेश प्राप्त झाले आहेत. ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवली जात असल्याने, ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत, त्यांनी काळजी करू नये. लवकरच त्यांच्याही खात्यात अनुदान जमा होईल, असे सांगण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याची वेळोवेळी तपासणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.