तोडकर हवामान अंदाज ; नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा अंदाज.
राज्यातील पावसाची चिंता संपुष्टात.
हवामान तज्ज्ञ तोडकर साहेब यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यातील पावसाची चिंता आता १००% संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. विदर्भ आणि खानदेश या भागांतून पाऊस लवकर निघून जाईल. मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्राच्या वातावरणातही लवकरच मोठी सुधारणा होईल. फक्त दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये काही दिवस वातावरण खराब राहण्याची किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यानंतर हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रातून पावसाची सक्रियता कमी होईल. यामुळे गेली दोन महिने शेतकऱ्यांच्या डोक्यावर असलेली पावसाची टांगती तलवार आता पूर्णपणे दूर झाली आहे.
थंडीचे आगमन आणि रब्बी पेरणीसाठी अनुकूल स्थिती.
पाऊस माघार घेतल्यानंतर राज्यात लवकरच थंडीचे आगमन होणार आहे. थंडीची सुरुवात सर्वप्रथम खानदेश आणि विदर्भ या भागांतून होईल, त्यानंतर ती मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रात हळूहळू पसरेल. सध्याचे वातावरण रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी अत्यंत पोषक आणि अनुकूल ठरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कडाक्याच्या थंडीसाठी सज्ज राहावे, पण पावसाची चिंता करू नये.












