राज्यात अवकाळी पावसाचे सावट कायम: मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला विजांसह पावसाचा इशारा.
मराठवाड्यावरील चक्राकार वाऱ्यांमुळे पावसासाठी पोषक वातावरण
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत अवकाळी पावसाचे सावट कायम आहे. सध्याची हवामान प्रणाली पाहता, गुजरात किनारपट्टीजवळील कमी दाबाचे क्षेत्र आता पूर्णपणे निवळले असले तरी, मराठवाड्यावर तयार झालेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे (हवेचे जोडक्षेत्र) पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. या चक्राकार वाऱ्यांमुळे बाष्पयुक्त ढग तयार होत असून, हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. म्यानमारजवळ असलेले कमी दाबाचे क्षेत्र उत्तरेकडे सरकत असल्यामुळे त्याचा राज्यावर कोणताही थेट परिणाम होणार नाही.
पुढील २४ तासांत पाऊस सार्वत्रिक नसणार
हवामान अभ्यासकांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील २४ तासांत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस सार्वत्रिक नसेल, तर विखुरलेल्या स्वरूपात एक-दोन ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींसह बरसण्याची शक्यता आहे. सकाळच्या सॅटेलाइट प्रतिमांमध्ये अमरावतीच्या उत्तरेकडील भाग, रत्नागिरीचा दक्षिण किनारा आणि गडचिरोलीच्या दक्षिण भागात हलक्या पावसाचे ढग दिसून आले, तर राज्याच्या उर्वरित भागात ढगाळ वातावरण असले तरी पावसाचा जोर नव्हता.












